शरद पवार यांचा विश्वास, 'महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार'
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या भाजप (BJP) प्रवेशानंतर देशभरात राजस्थान आणि महाराष्ट्र चर्चेत आला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस तर महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि काँग्रेस (Congress) असे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थान आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारेही अडचणीत येऊ शकतात अशी चर्चा आहे. दरम्यान, या चर्चेच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन असे म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाबाबत विश्वास व्यक्त करताना शरद पवार यांनी म्हटले आहे की, 'महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेची मला माहिती आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन. राज्य सरकारबाबत कोणाला काय म्हणायचे ते म्हणू दे पण हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणारच', असे पावर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वांना सांभाळून घेत आहेत. सर्वसहमतीने सरकार चांगले चालले आहे, असे कौतुगोद्गारही पवार यांनी या वेळी काढले. शरद पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला. या वेळी ते विधीमंडळ वार्ताहर संघात माध्यमांशी बोलत होते. नुकताच शिमगा संपला आहे. त्यामुळे आता विरोधकांकडे कोणताच मुहूर्त राहिला नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला आहे. (हेही वाचा, राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार व फौजिया खान आज भरणार अर्ज; भाजपकडून रामदास आठवले यांचे नाव निश्चित)

एएनआय ट्विट

दरम्यान, मध्यप्रदेशातील राजकीय स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. कमलनाथ यांच्या राजकीय क्षमतेवर तिथल्या जनतेचा विश्वास आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या विधानानंतर भारतीय जनता पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे.