'काय ते डोंगर... काय ती झाडी... काय ते हाटेल... ओके एकदम' या डायलॉगमुळे घराघरात पोहोचलेले एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) आज (7 जून) थोडक्यात बचावले. शहाजी बापू पाटील यांच्या मनोरा आमदार निवासातील (Manora Amdar Niwas) खोलीचे छत कोसळले. या वेळी शहाजी बापू खोलीतच होते. या दुर्घटनेतून शहाजीबापू थोडक्यात बचावले. शहाजी बापू सुरक्षीत असल्याचे पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण, 'काय ते आमदार निवास.. काय ती खोली आणि काय ती वेळ' असे म्हणायची वेळ शहाजी बापूंवर आली होती. पण थोडक्यात टळली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आकाशवाणी आमदार निवासात शहाजी बापू यांची खोली आहे. या खोलीत शाहाजी बापू आराम करत होते. मात्र, मध्यरात्रीच्या वेळी त्यांच्या खोलीचे छत कोसळले. या घटनेतून शहाजीबापू थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. खोलीचे छत कोसळल्याचे कळताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली. खोलीची पाहणी केल्यावर दुरुस्तीसाठी ही खोली काही काळ बंद ठेवण्यात आली आहे. (हेही वाचा, Kai Jhadi Kai Dongar Song: काय झाडी, काय डोंगर...च्या मीम्सनंतर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
शहाजी बापू पाटील हे सांगोला मतदारसंघातून शिवसेना आमदार आहेत. ते शिवसेना पक्षाच्या तिकीटावर निवडून आले असले तरी ते सध्या एकनाथ शिंदे समर्थक आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांमध्ये शहाजी बापू यांचा समावेश होतो. गुवाहाटी येथून कार्यकर्त्याला केलेल्या फोनमुळे शहाजी बापू पाटील हे जोरदार चर्चेत आले. त्यांचा 'काय ते डोंगर... काय ती झाडी... काय ते हाटेल... ओके एकदम' हा फोनवरील डायलॉग महाराष्ट्रभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक उत्साही मंडळींनी तर या डायलॉगवर गाणीच बनवली आहेत.