Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहोचली असल्याचंदेखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, आज जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड-19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे ई-पद्धतीने मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा - रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 4 सदस्यीय समिती गठीत; राजेश टोप यांची माहिती)

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जालना शहरात आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणूची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे.

कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनादेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच कोरोना लढ्यात आरोग्य, पोलीस, महसुल यंत्रणा आपलं कर्तव्य पार पाडत असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.