सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा खरा नेता अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) नेते माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) आज (31 जुलै) अनंतात विलीन झाले. सांगोला (Sangola) या त्यांच्या कर्मभूमीत दुपारी अडीच वाजणेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वसामान्यांचे लाडके 'आबा' अनंतात विलीन झाले. गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण सांगोला तालूक्यातून जनसागर लोटला होता. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी गणपतराव देशमुख यांना निरोप दिला. 'परत या... परत या.... गणपतराव देशमूख परत या...', 'अमर रहे अमर रहे... गणपतराव देशमुख अमर रहे' अशा घोषणांनी वातावरण दणानून गेले. 'आमचे आबासाहेब गेले...' असे उद्गार काढत उपस्थित जनसमूदाय हळहळ व्यक्त करत होता.
सोलापूर येथील खासगी रुग्णालयात शुक्रवारी (30 जुलै) रात्री सव्वा नऊ वाजणेच्या सुमारास गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोलापूर जिल्हा आणि अवघा सांगोला तालुका शोकसागरात बुडाला. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थीव सांगोला येथे आणण्यात आले. दरम्यान, गणपतराव देशमुख यांची लोकप्रियता आणि कोविड परिस्थिती पाहता सोलापूर येथून पार्थीव घेऊन सांगोला येथे घेऊन येतानाच रस्त्यांवरील अनेक ठिकाणी, गावागावंत थांबवून नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. (हेही वाचा, Ganpatrao Deshmukh Passes Away: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
सकाळी 6.30 वाजता गणपतराव देशमुख यांचे पार्थीव सोलापूर येथून मोहोळ मार्गे सांगोला येथील पेनूरला या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. येथे साधारण अर्धा तास त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळीच 11 वाजता पंढरपूर मार्गे त्यांचे पार्थीव सांगोला येथे आणण्यात आले. सांगोला येथे आगमन झाल्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला पंचायत समिती, कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जय भवानी चौक, सांगोला नगरपरिषद, चौक नेहरू चौक, स्टेशन रोडने अशा विविध ठिकाणांवर अंत्यदर्शन झाल्यावर त्यांचे पार्थीव सांगोला येथील शेतकरी सूतगिरणीवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात गणपतराव देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.