इक्बाल मिर्ची आर्थिक व्यवहार प्रकरण; प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल
NCP leader Praful Patel arrives at Enforcement Directorate office (Photo Credit - ANI)

कुख्यात गुन्हेगार दाऊदचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते (Nationalist Congress Party Leader) व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) अंमलबजावणी संचालनालयात (Enforcement Directorate) दाखल झाले आहेत. ईडीने पटेल यांना शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परंतु, पटेल यांनी मिर्चीसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नसल्याचे स्पष्टीकरण देत निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता.

हेही वाचा - माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांना ईडीची नोटीस, 'मिर्ची' प्रकरण चांगलच झोंबणार

नेमकी काय आहे प्रकरण ?

वरळीत ‘सीजे हाऊस’ या इमारतीची पुनर्बाधणी पटेल यांच्या कंपनीने केली होती. या इमारतीमध्ये दाऊदचा विश्वासू सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीच्या नावे सदनिका आहे. मिर्ची याची पत्नी हजरा मिर्ची हिने पटेल यांच्या कंपनीशी व्यवहार केला होता. तसेच सदनिका खरेदीच्या करारावर प्रफुल्ल पटेल आणि हजरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याच्या पत्नीशी पटेल यांनी आर्थिक व्यवहार केला. त्यामुळे पटेल यांना आर्थिक फायदा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे.

या व्यवहाराच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. पटेल यांना आज (शुक्रवारी) मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हवाई वाहतूक मंत्री असताना झालेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने पटेल यांची चौकशी केली होती.