Ashok Chavan, Sanjay Raut (Photo Credit: PTI)

संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदावरून (UPA President) महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकारण रंगले आहे. यूपीएचे नेतृत्व कोण करणार? यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे, अशी ईच्छा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलून दाखवली आहे. एवढेच नव्हेतर, याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीकादेखील केली आहे. या टीकेला काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे.

शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. राज्यात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. तसेच शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा सल्ला शिवसेनेने देणे उचित नाही, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे. यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- Chandrakant Patil Slams Eknath Khadse: 'तुम्ही ईडी लावली तर, मी सीडी लावेन' एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

संजय राऊत काय म्हणाले?

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात केंद्र सरकारकडून कोणतेही पाठबळ दिले जात नाही. देशात भाजपची तानाशाही सुरु आहे. या तानाशाहीविरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यायला हवे. तसेच देशात विरोधीपक्षाची दुर्दशा झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर केली आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना ईडीकडून आलेल्या नोटीसावरही भाष्य केले आहे. राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाच्या वेळी खडसे यांनी एक वक्तव्य केले होते. जर तुम्ही माझ्यामागे ईडी (ED) लावलीत तर मी तुमची सीडी लावेन, असे ते म्हणाले होते. मला वाटते की त्यांची सीडी बाहेर येऊ शकते, असे मतही अशोक चव्हाण यांनी एका प्रश्नावर व्यक्त केले आहे.