Seat Belt Representational Image (photo credit- Pixabay)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चारचाकी वाहनातील प्रत्येकासाठी सीट बेल्ट (Seat Belt) लावणे अनिवार्य केले आहे. आजपासून या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली. मुंबई वाहतूक पोलीस पुढील दहा दिवस या नियमाबाबत जनजागृती करणार आहेत. पोलिसांनी मंगळवारी लोकांना सीट बेल्ट लावण्याबाबतच्या नियमाबाबत जागरूक राहण्यासाठी पुढील 10 दिवसांची मुदत दिली आहे. म्हणजेच पुढील 10 दिवस कारवाई होणार नाही, परंतु बेल्ट असूनही ते न बांधणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

मुंबई वाहतूक पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या संपूर्ण 10 दिवसांमध्ये नागरिकांना सीट बेल्टचे महत्त्व पटवून सांगितले जाणार आहे. रस्त्यावरील वाहतूक कर्मचार्‍यांच्या माध्यमातून, सोशल मीडियाद्वारे लोकांना याबाबत जागरूक केले जाईल. अशाप्रकारे, त्यांना हळूहळू या कल्पनेची सवय होईल आणि त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्याची गरज समजेल.’

अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील (वाहतूक) यांनी सोमवारी सांगितले की, ‘वाहनात सीट बेल्टची तरतूद नसल्यास, वाहन चालक आणि मालक यांना इशारा दिला जाईल. मात्र त्यांनी सीट बेल्ट जोडल्यानंतर तो घातला नाही तर कठोर कारवाई केली जाईल.’ मंगळवारी शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नेहमीची तपासणी सुरू होती. वांद्रे हद्दीत, पोलीस पुढच्या सीटवर तसेच मागील सीटवर सीट बेल्ट तपासताना दिसले. अनेक प्रकरणांमध्ये, लोकांना सीट बेल्ट घालण्याच्या या नवीन कायद्याबद्दल माहिती नसल्याचे दिसून आले.

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्रत्येकजण सोशल मीडियावर नाही आणि अनेक लोक दररोज बातम्याही वाचत नाहीत. आज सीट बेल्ट चेक करताना बहुतेकांनी आम्हाला याबाबत विचारले. पुढील 10 दिवसांमध्ये आम्ही नागरिकांना हळूहळू जागरुक करू.’ आज शहरातील पोलिसांनी नागरिकांनी नव्या कायद्याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: Mumbai: MMRDA ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक केला लॉन्च)

शहरातील टॅक्सीवाले अजूनही या नियमाबाबत अनिश्चित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. FPJ शी बोलताना एका टॅक्सीवाल्याने सांगितले की, टॅक्सींमध्ये मागच्या सीटसाठी सीट बेल्ट बसवलेले असले तरी प्रवासी सीट बेल्ट घालण्याची तसदी घेणार नाहीत. ड्रायव्हर म्हणून आम्ही ते नेहमीप्रमाणे परिधान करत राहू, परंतु प्रवाशांबद्दल खात्री नाही.’ सीट बेल्टबाबत एमटीपीच्या अधिसूचनेनुसार, मुंबई शहराच्या रस्त्यावरून प्रवास करणारे सर्व मोटार वाहन चालक आणि वाहनातील सर्व प्रवासी यांना सीट बेल्ट अनिवार्यपणे बांधणे आवश्यक आहे. अन्यथा, मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 च्या कलम 194 (b) (1) अंतर्गत कारवाई केली जाईल.