Education Minister Varsha Gaikwad (PC - MahaDGIPR)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील तसेच राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय पहिले ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्यात येणार असल्याचंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. अशातचं आता राज्य सरकारने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना आता घरात राहून म्हणजेचं 'लर्न फ्रॉम होम' (Learn From Home) चा आधार घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

यासाठी 12 वी अभ्यासक्रमाचे सर्व साहित्य पीडीएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा - दिल्लीत मास्क लावणे बंधनकारक: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आदेश ; 8 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

कोरोनाचा व्हायरसमुळे विद्यार्थ्यांना तसेच पालकांना घराबाहेर पडणं अशक्य झालं आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या पुस्तकांच्या यादीमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, गणित, विज्ञान, तर्कशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे.