Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू; शिरूरमधील घटना
Leopards | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

शिरुर परिसरातील दहिवडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने दहिवडी परिसरात शोककळा पसरली आहे. यश सुरेश गायकवाड (वय 11) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. गायकवाड कुटुंबीय दहिवडी गावातील देवमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी सकाळी यश घराच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या फडात गेला. बराच वेळ झाला, तरी यश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा यश उसाच्या फडात मृतावस्थेत सापडला. ( Maharashtra Heavy Rain Alert: कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; एनडीआरएफची टीम तैनात)

यशवर बिबट्ट्याने हल्ला केल्याचे समोर आल्यानंतर घटनेची माहिती त्वरित वन विभागाला कळविण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यातील दहिवडी गाव परिसरात बिबट्याचा वावर आहे. या भागात दाट झाडी, उसाचे फड आहेत. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.

यशचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शिरुर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या वावरामुळे शिरुर तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी दहिवडी गावात सहा पिंजरे, तसेच ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या भागात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.