Uddhav Thackeray and Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींच्यावरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेची मुदत दिली आहे. त्यानंतर लाउडस्पीकरबाबतचा वाद चिघळला. अशात नेते रवी राणा आणि नवनीत राणा यांना हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) प्रकरणावरून अटक झाली व काल किरीट सोमैय्या यांच्यावरही हल्ला झाला. त्यानंतर आता भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

‘उत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र "हनुमान चालिसा" म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत "बुडवून दाखवलं"!’ असे ट्वीट नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांना भेटायला गेल्यावर किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्याचा भाजपकडून निषेध केला जात आहे. या कथित हल्ल्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणाले, ‘भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आणि ते जखमी झाले. पोलीस स्टेशनच्या आवारातच हा हल्ला झाला आहे. महाविकास आघाडी सरकार पोलिसांसमोरच हिंसाचार करत आहे.’ (हेही वाचा:  राज ठाकरेंनी भोंग्याबाबत घेतलेल्या मुद्द्याला गुजराती समाजाच जाहीर समर्थन, मुंबईत लावले बॅनर्स)

दरम्यान, वांद्रे न्यायालयाच्या खंडपीठाने अपक्ष लोकसभा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करताना मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या दोघांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात रात्र काढली होती. आयपीसीचे कलम 34, 153अ आणि मुंबई पोलीस कायद्याचे कलम 37(1) आणि 135 नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.