Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरुन भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. भाजप आणि इतरांनी त्याबाबत आम्हाला सांगू नये, असे राऊत म्हणाले. शिवाय, भाजपची सावरकर यात्रा (Savarkar Gaurav Yatra) ही खरे तर अदानी बचाव यात्रा (Adani Bach Yatra) असल्याचा टोलाही लगावला.

राहुल गांधी यांच्या टीकेनंतर महाराष्ट्रात 'सावरकर गौरव यात्रा' काढण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या यात्रेवर टीका करताना संजय राऊत यांनी म्हटले की, ही कसली 'सावरकर गौरव यात्रा?' ही तर 'अदानी बचाव यात्रा'. सावरकर यांचा मुद्दा उपस्थित करुन त्यांना अदानी यांच्या विषयावरुन लक्ष दुसरीकडे भरकटवायचे आहे. म्हणूनच त्यांना एक प्रकारची अदानी गौरव यात्राच काढायची असल्याचे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray Warns Rahul Gandhi: 'वीर सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही'; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा)

ट्विट

राहुल गांधी यांच्या "माझे नाव सावरकर नाही आणि गांधी कधीच माफी मागत नाहीत" या टिप्पणीवर संजय राऊत म्हणाले, वीर सावरकर हे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक होते. आम्ही वीर सावरकरांचा नेहमीच आदर केला आहे. इतकेच नव्हे तर आम्ही सावरकर जगतो. त्यामुळे त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य त्यांनी करु नये. आम्ही मल्लिकार्जून खडगे यांच्याशी बोलतो आहोत. आम्ही चर्चेतून मार्ग काढू, असेही संजय राऊत म्हणाले.

ट्विट

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही विरोधी पक्षांसोबत राहू. विरोधी पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्ही मान्य करु. संसदेचे कामकाज चालत नाही त्याची जबाबदारी सरकारवर आहे. सरकारलाच संसदेचे कामकाज चालू नये असे वाटते. राहुल गांधी यांनी अदानी उद्योग आणि देशहीताशी संबंधीत इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. जो सत्ताधाऱ्यांना दाबायचा आहे. पण तो आवाज दाबता येणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.