प्रजासत्ताक दिनी आज सातारा, बीड, हिंगोली मध्ये तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
beed | PC: Twitter/ @News18lokmat Screengrab

भारतामध्ये आज 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. राष्ट्रभक्तीने आज अनेकांची छाती फुलून जाते पण राज्यात एकीकडे हा राष्ट्रीय सण साजरा होत असताना सातारा, बीड आणि हिंगोली मात्र तीन व्यक्तींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यामध्ये बीड (Beed) मध्ये पोलीस मुख्यालयावर मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्यासमोरच एकाने अंगावर डिझेल ओतून घेतल्याचा प्रकार घडला आहे. मात्र यावेळी उपस्थित पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला परावृत्त करून ताब्यात घेतले आहे. India's 73rd Republic Day 2022: भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर ध्वजावंदन.

बीड मधील घटना

बीड शहरातील पंचशील नगर भागातील रस्त्याच्या बोगस कामाची तक्रार करूनही कारवाई न झाल्याने या व्यक्तीनं हे पाऊल उचललं आहे. विनोद शेळके असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

हिंगोली मधील घटना

हिंगोली मध्ये आज सकाळी भारतीय मानव अधिकार संघटन हिंगोली जिल्हा अध्यक्ष मिलिंद प्रधान यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयाच्या गेटवर त्यावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. कायद्याचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवून तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी रजिस्टर सेनगाव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी त्यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्र लिहून मागणी केली होती. मात्र चौकशी न झाल्याने त्यांनी हा प्रकार केला होता.

सातारा मधील घटना

सातारामध्येही एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोष आरोपपत्र दाखल नसल्याचा आरोप करत महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

सुदैवाने या तिन्ही घटनेमध्ये आत्मदहन करणार्‍या व्यक्तीला सुरक्षित वाचावण्यात पोलिसांना यश आले आहे.