नवसाला पावणारा, इच्छापूर्ती करणारा असे दावे करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर कारवाईची शक्यता
Ganpati Festival (Photo Credits-Facebook)

यंदा 2 ते 12 सप्टेंबर 2019 दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गल्लोगल्ली असणार्‍या गणेशोत्सवाच्या मंडळांमध्ये अधिकाधिक भक्तांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरू असते. सार्वजनिक मंडळं देखील भक्तीचा बाजार मांडून 'नवसाचा गणपती', 'इच्छापूर्ती करणारा' गणपती अशा टॅगलाईन मार्केटींगसाठी वापरल्या जातात. मात्र आता केवळ गणेशभक्तांना अशाप्रकारे आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग फंडे वापरल्यास संबंधित मंडळांवर जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत कारावाई होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे दावे अंधश्रद्धेला खतपाणी देत असल्याचं सांगितले आहे.

नवसाच्या बहाण्याने भक्ताने स्वतःला इजा पोहचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला प्रोत्साहित करणार्‍यावर कारवाई होऊ शकते. त्यासाठी कायद्यामध्येही तरतूद आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधील सीमारेषा ओलांडली जाऊ शकते. परिणामी हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो असे सांगण्यात आले आहे. अनेकदा भाविकांच्या अंधश्रद्धाळू पणाचा फायदा घेत पैसे उकळले जाऊ शकतात. त्यामुळे आनंदाने हा सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

यंदा मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून खास नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गणेशभक्तांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात याची माहिती दिली आहे. यंदा मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचं भान ठेवत सण साधेपणाने साजरा करत पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.