
महाविकास आघाडी सरकार मधून शिवसेनेने बाहेर पडावं या मागणीसाठी आक्रमक होत 40 शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली नवा गट स्थापन केला आहे. यामध्ये शिंदे गटात सहभागी आमदारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यास शिवसेनेने सुरूवात केली आहे. नुकतीच संतोष बांगर यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याचं 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर संतोष बांगर यांनीही त्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संतोष बांगर यांनी 'मीच शिवसेनेचा हिंगोली जिल्हाप्रमुख राहणार' असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी माझ्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. मी ती निभावत आहे. विधिमंडळातही मी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केले आहे त्यामुळे कुठलीही बंडखोरी केली नसल्याची प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.
दरम्यान संतोष बांगर यांनी आपलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. त्यांनी देखील 'शिवसेनेचा हिंगोली जिल्हाप्रमुख तूच आहेस. तुला कोणीही पदावरून काढू शकणार नाही.' असं म्हणत काम करत राहण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं आहे.
संतोष बांगर यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीत महाविकास आघाडी च्या बाजूने मतदान केले होते तर दुसर्या दिवशी बहुमत चाचणी दरम्यान शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले होते. 24 तासांत त्यांचे झालेले मतपरिवर्तन हा चर्चेचा विषय होता. दरम्यान सत्तानाट्य घडत असताना संतोष बांगर हे 'उद्धव ठाकरे यांना साथ द्या' म्हणत जनतेत फिरत असताना रडत असल्याचं पहायला मिळाले होते त्यामुळे त्यांनी बदलेली भुमिका विशेष गाजत आहे.
संतोष बांगर यांच्याप्रमाणेच तानाजी सावंत, एकनाथ शिंदे यांच्यावरही शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पदावरून हटवण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीचं पत्र जारी करत सांगण्यात आले आहे.