औरंगाबाद पश्चिम चे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयामधून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना हृद्यविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर औरंगाबाद (Aurangabad) मधून मुंबईमध्ये दाखल झालेल्या संजय शिरसाट यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आता हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली आहे. पुढील एक आठवडा त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये शिरसाटांवर डॉक्टर गोखले आणि राव यांच्या नेतृत्त्वाखाली उपचार करण्यात आले आहेत. अॅन्जिओप्लास्टी नंतर त्यांना 4 दिवस लीलावती मध्ये ठेवण्यात आले होते. सध्या डॉक्टरांनी त्यांना जास्त ताण न घेण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी त्यांची रूग्णालयात जाऊन आरोग्याची विचारपूस केली होती. संजय शिरसाट यांना 17 ऑक्टोबरच्या रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर तातडीने शिरसाटांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. शिरसाटांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र पुढील उपचारांसाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिरसाट यांना शनिवारपासून अस्वस्थ वाटत होते. अशात त्यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.
संजय शिरसाट हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेले नेते आहेत. शिंदे-फडणवीस सरकार मध्ये त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण त्यांना अपेक्षित पद मिळालं नसल्याने मध्यंतरी ते नाराज असल्याचीही चर्चा होती पण शिरसाट यांनी या सार्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.