File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

सचिन वाझे प्रकरणामुळे (Sachin Vaze Case) महाविकासआघाडी सरकार (Aghadi Government) अस्थिर होईल या भ्रमात कोणी असेल त्यांनी त्यातून बाहेर पडावे. हे सरकार स्थिर आहे, असे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. महाविकासआघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी संजय वाझे प्रकरणात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राऊत यांनी उत्तरे दिली.

सचिन वाझे प्रकरणात दोषी आढळलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिला पाठिशी घातले जाणार नाही. सचिन वाझे हे प्रकरण तितके मोठे नाही. ज्याचा थेट सरकारवर परिणाम होईल. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सरकार दोन हावलदारांमुळे पडले होते. तशी स्थिती या सरकारची नाही. एका एपीआयमुळे हे सरकार अस्थिर झाल्याच्या संभ्रमात कोणी राहू नये, असेही संजय राऊत यांनी म्हटले. ( हेही वाचा, Sharad Pawar On Maha Vikas Aghadi Government: महाविकासआघाडी सरकार स्थिर, कोणताही धोका नाही: शरद पवार)

दरम्यान, सचिन वाझे यांचे पूर्वी शिवसेनेशी संबंध होते. खरेत प्रत्येक मराठी माणसाचा शिवसेनेशी संबंध असतो. असायलाच हवा. वाझे यांचाही असेल. त्यात काहीही गैर नाही, असे संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.

शरद पवार यांच्याबाबत झालेल्या चर्चेबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. महाविकासआघाडी सरकारचे ते मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटत असतात. आम्हीही पवार यांना भेटत असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांनीही महाविकासआघाडी सरकार स्थिर असल्याचे काल (16 मार्च) म्हटले होते. शरद पवार म्हटले की, सरकार चालवताना अनेक अडचणी येत असतात. त्यावर विचारपूर्वक मार्ग काढावा लागतो. हे सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही. दरम्यान, सचिन वाझे प्रकरणाचा दाखला देत राज्यात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा असल्याचे प्रसारमाध्यमांनी विचारले. यावर शरद पवार म्हणाले याबाबत मला माहिती नाही. माझ्यासाठी ही एक बातमी आहे. तुम्हाला कुठून मिळाली? असा प्रतिप्रश्न करत राज्यातील मंत्रीमंडळाच्या खांदेपालटाची शक्यता पवार यांनी फेटाळून लावली.