Sharad Pawar | (Photo Credit : ANI)

महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काढले आहेत. ज्येष्ठ नेते पीसी चाको यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार दिल्ली येथे बोलत होते. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांची आजच भेट घेतली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले होते.

शरद पवार यांनी सांगितले की, सरकार चालवताना अनेक अडचणी येत असतात. त्यावर विचारपूर्वक मार्ग काढावा लागतो. हे सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही, असे पवार या वेळी म्हणाले. दरम्यान, सचिन वाझे प्रकरणाचा दाखला देत राज्यात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा असल्याचे प्रसारमाध्यमांनी विचारले. यावर शरद पवार म्हणाले याबाबत मला माहिती नाही. माझ्यासाठी ही एक बातमी आहे. तुम्हाला कुठून मिळाली? असा प्रतिप्रश्न करत राज्यातील मंत्रीमंडळाच्या खांदेपालटाची शक्यता पवार यांनी फेटाळून लावली.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात येणार असल्याच्याही चर्चा आहेत, असे विचारले असता याबाबत राज्याच्या मुंख्यमंत्र्यांना विचारा. मी त्यावर केस भाष्य करेन असे पवार यांनी म्हटले. (हेही वाचा, PC Chacko To Join NCP: पीसी चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश)

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची राजधानी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना 'एव्हरीथिंग्ज आर वेल' अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे मोठे नेते आहेत. महाविकासआघाडी सरकारचे ते मार्गदर्शक आहेत. त्यामुळे विविध विषयांवर आम्ही नेहमी भेटत असतो. आजच्या बैठकीत विशेष अशी चर्चा झाली नाही. मी एका कार्यक्रमाचे निमंत्रण शरद पवार यांना दिले आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. राऊत हे दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.