Sanjay Raut On BJP: जुनी थडगी उकरत ED हडप्पा, Mohenjo-daro काळापर्यंत पोहोचेल; संजय राऊत यांचा टोला
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि विरोधकांना इशारा दिला आहे. ज्या काय चौकशा व्हायच्या त्या एकदा पूर्ण होऊ द्या. मग माझ्याकडे असलेली 120 नेत्यांची यादी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला देतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आपल्यालाही ईडीची नोटीस आल्याची चर्चा आहे, असे विचारले असता अद्यमाप आपल्याला नोटीस आली नाही. परंतू, ही नोटीस केवळ मलाच काय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसमधीलही काही लोकांना येऊ शकते असे राऊत म्हणाले. मी नोटीशीची वाट पाहतो आहे, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले. जुनी थडगी उकरत ED हडप्पा, Mohenjo-daro काळापर्यंत पोहोचेल, असा टोलाही राऊत यांनी या वेळी लगावला.

शिवसेना आमदार प्रताप सरकानाईक ( Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. त्याबाबत विचारले असता संजय राऊत बोलत होते. महाराष्ट्रात जे लोक केंद्र सरकार विरोधात बोलतात त्यांच्यावर ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थांचा वापर करुन दबाव आणला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

मला किंवा महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणाला ईडीची नोटीस आल्यास मला धक्का बसणार नाही. 20 वर्षे जुनी थडगी उकरण्याचे काम सुरु आहे. ही जुनी थडगी उकरत ED हडप्पा, Mohenjo-daro काळापर्यंत पोहोचेल. पण आम्ही त्याला अजिबात घाबरत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोक घोटाळे करुन देशाबाहेर पळत आहेत. लोकांची संपत्ती एका वर्षात एक हजार कोटीवरुन थेट पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील प्रमुख लोकांवर दबाव टाकला जात आहे. दबावाचे राजकारण केले जात आहे. पण हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात असले राजकारण चालत नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय उद्या आम्ही डाव उलटवू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. (हेही वाचा, ED Eummons Pratap Sarnaik: अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरकानाईक यांना चौकशीसाठी बोलावले)

प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे की, ज्या प्रकरणात ईडी त्यांची चौकशी करत आहे त्या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबध नाही. परंतू, मराठी माणसाने व्यवसाय करणे, उद्योगात भरारी घेणे हा काही गुन्हा आहे का? मराठी माणसाने व्यवसाय केल्यामुळे जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर, मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील, कोणत्याही चौकशीला कोणीही घाबरार नाही, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले.