शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. राऊत यांच्या या भेटीमागील नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, संजय राऊत यांनी ही एक सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय.
यावेळी राऊत यांनी सांगितलं की, राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस झाले त्यांना व्यक्तीशा भेटलो नव्हतो. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत. एखाद्या पिता-पुत्राने त्यांचे संबंध आहेत. हे संबंध असेच राहावेत. विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे. परंतु, सध्या देशात तसेच महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन चर्चा करायला हवी, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारचं बारा बलुतेदार आणि श्रमिकांसाठीचं पॅकेज ऐकून भाजपला भोवळ येईल - हसन मुश्रीफ)
भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी सुचना केली होती. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसताना केलेल्या हस्तक्षेपाबाबत उच्चशिक्षणमंत्र्यांना समज द्यावी, असंही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं. यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. उदय सामंत यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपाल सांगतिल त्याप्रमाणे संबंधित मंत्री निर्णय घेतील, असंही संजय राऊत स्पष्ट केलं आहे.