'आमच्याकडे इतर पर्याय पण आहेत', शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजप ला इशारा
Sanjay Raut (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासूनच शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये टोकाचे मतभेद दिसून येत आहेत. निवडणुकांआधी जागा वाटपावरून झालेले रुसवे फुगवे आणि आताच्या मतभेदांमुळे एकूणच महायुतीचं समीकरण बदलताना दिसत आहे.

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून सातत्याने होणाऱ्या भाजपवरच्या टीकेमुळे भाजप शिवसेनेसोबाबत किती एकोपा ठेवते हे लवकरच समजेल. त्यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रात कुण्या दुष्यंतांचे वडील जेलमध्ये नाहीत असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

सध्या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपला या निवडणुकीत 105 जागी विजय मिळाला तर शिवसेनेने फक्त 56 जागा मिळवल्या. पण तरीही शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकत नसल्याने शिवसेना मुख्यमंत्री पदावर असून बसली आहे. तसे इशारा संजय राऊत यांनी ANI शी बोलताना दिला. तसेच आपल्याकडे पर्याय असल्याचा इशारा देखील भाजपला त्यांनी दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आमच्याकडे इतर पर्याय पण आहेत. पण आम्हाला ते पर्याय स्विकारण्याचं पाप करायचं नाही. शिवसेनेने नेहमी सत्याचं राजकारण केलं आहे. आम्हाला सत्तेची भूक नाही."

सामना मुखपत्रातून होणारी टीका थांबत नाही तोपर्यंत भाजप शिवसेनेशी चर्चा करणार नाही? वाचा सविस्तर

"लोकशाहीत कोणीही कोणताही पर्याय निवडू शकतो. आम्ही युती धर्माचं पालन करतो. जर यांचं कोणी पालन करत नसेल तर राज्यातील जनता त्यांना उत्तर देईल. जर तुमचा मित्रपक्ष तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचत असेल तर हे योग्य नाही. आम्ही हालचालींवर नजर ठेवून आहोत," असंही राऊत म्हणाले.