Saamana Editorial: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात शीत युद्ध चालल्याचं पाहायला मिळतयं. अशातचं आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून काँग्रेसला औरंगाबादच्या नामांतरणावरून टोला लगावला आहे. औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. त्यामुळे सच्चा मराठी आणि कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचं कारण नाही.
मराठवाड्यातील सरकारी कागदोपत्री औरंगाबाद असं नाव असलेल्या शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावे यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोथ करणारे उपस्थित करत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच, असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवर टीका केली आहे. (वाचा - Aurangabad Name Change: औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य)
औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला. शहाजहान हा औरंगजेबाचा बाप. बापाने त्याला 1657 साली दक्षिणेत पाठवले. विजापूर, गोवळकोंड राज्यांवर स्वाऱया करून औरंगजेबाने हाहाकार माजवला. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने ‘औरंगाबाद’ शहर वसविले. औरंगजेब क्रूर आणि धूर्त होता. बादशाही मिळवण्यासाठी त्याने आजारी बापाला कैद केले. सख्ख्या भावांचा खून केला. औरंगजेब हा एक कर्मठ सुन्नी मुसलमान होता. तो परधर्मद्वेष्टा होताच, पण हिंदूंचा कडवट दुश्मन होता. अनेक तऱहेचे कर लावून त्याने हिंदूंचा भयंकर छळ केला. 1669 मध्ये त्याच्याच हुकमाने मथुरेतील केशवदेवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. मंदिर पाडून मशिदी बांधण्याचा त्याला छंदच जडला होता, असा इतिहासही संजय राऊत यांनी अग्रलेखात सांगितला आहे.
महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी.
औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!, असं खोचक टीकाही संजय राऊत यांनी काँग्रेसवर केली आहे.