Aurangabad Name Change: औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य
एकनाथ शिंदे (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Name Change) मुद्दा चांगलाच पेटला आहे. औरंगाबादच्या नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकमत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना (Shiv Sena) गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी करत असताना महाविकास आघाडीत मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून (Congress) याला विरोध दर्शवला जात आहे. या संदर्भात आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संभाजीनगर हा स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे. यामुळे सरकार स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करेल. जे लोकांना हवे आहे, तोच निर्णय सरकार घेणार असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राज्यात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर होणारच, असे स्पष्ट केल्यानंतर आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, संभाजीनगर हा स्थानिक लोकांच्या अस्मितेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगरच केला जातो. त्यामुळे सरकार तेथील लोकांच्या भावनांचा आदर करेल. जे लोकांना हवे आहे, तोच निर्णय सरकार घेणार, असे एक शिंदे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे आज सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Vaccine Price: महाराष्ट्रात कोरोना लशीची किंमत किती असेल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर

दरम्यान, आदित्य ठाकरे हे औरंगाबाद येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करायला आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणार का? असा प्रश्न विचारला. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, पुढे पुढे पाहा काय होते? महाविकास आघाडीचे एकमत करूनच आम्ही शहराचे नाव बदलून दाखवणार, असे ते म्हणाले आहेत.