CM Uddhav Thackeray | (Photo Credit- Facebook)

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास (Coronavirus Vaccine) अखेर आजपासून (16 जानेवारी) सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोव्हिड सुविधा केंद्रात झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना नियमितपणे मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यात कोरोनाची लस मोफत दिली जाणार का? याबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी येथील जम्बो लसीकरण केंद्रात राज्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना सर्वप्रथम कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. लस आली तरी नागरिकांनी अधिक घेतली पाहिजेत. नागरिकांनी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Launches COVID-19 Vaccination Drive in Mumbai: मुंबईत कोविड-19 लसीकरणाला प्रारंभ; नियमांचे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

तसेच, महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, कोव्हिड लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून ज्या काही सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार, सर्वप्रथम कोरोना युद्ध्यांना ही लस देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, केंद्र सरकारकडून अद्याप लस मोफत देण्याबाबत कोणतीही सूचना आली नाही. लशीची किंमत किती असेल? याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. केंद्राने याबद्दल भूमिका स्पष्ट केली तर, राज्यात आम्ही पुढचा निर्णय घेऊ' असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

"महाराष्ट्राला 17.50 लाख कोरोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. दरम्यान, 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, आम्हाला कोरोना प्रतिबंधक लसीचे 10 लाख डोस मिळाले आहेत. यामुळे आम्हाला अजून 7 लाख 50 हजार लसींच्या डोसची आवश्यकता आहे” असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.