CM Uddhav Thackeray Launches COVID-19 Vaccination Drive in Mumbai: मुंबईत कोविड-19 लसीकरणाला प्रारंभ; नियमांचे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

कोविड-19 (Covid-19) संकटावर आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. ते मुंबईतील कोविड लसीकरण शुभारंभ प्रसंगी बोलत होते. बीकेसी ग्राऊंडवरील कोविड सेंटरमध्ये आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईतील पहिली लस देण्यात आली. त्यानंतर इतर डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक यांना लस देण्यात येईल. दरम्यान, यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) देखील उपस्थित होते.

कोरोनाची लस मिळाली तरी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्वांना लस मिळायला अजून वेळ आहे. तसंच लसीचा प्रभाव तपासण्यासाठी देखील काही अवधी जाईल तोपर्यंत तोंडावरचा मास्क हीच खरी लस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Corona Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण प्रारंभ, 285 केंद्रांवर यंत्रणा सज्ज)

CMO Maharashtra Tweet:

कोविड-19 संकटाच्या काळात अविश्रांत मेहनत घेणाऱ्या आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे त्यांनी मनापासून आभार मानले. त्यांच्या कार्यामुळेच कोरोना विरुद्धचा लढा लढणे शक्य झाले असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यामुळे त्यांना सर्वप्रथम लस मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसंच या संकटात मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योद्धांचेही त्यांनी स्मरण केले.

आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे त्यामुळे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर लसीकरणासाठी सर्वांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी देखील 'दवाई भी, कडाई भी' म्हणत नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला.