Sanjay Raut On BJP: भाजप आणि मेहबुबा यांची मैत्री आहे; दोघांनी मिळून सत्ता काबीज केली, त्यामुळे मेहबुबा जे काही बोलल्या त्याला BJP जबाबदार आहे - संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

Sanjay Raut On BJP: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'भाजप आणि मेहबुबा यांची मैत्री आहे. दोघांनी मिळून सत्ता काबीज केली. त्यामुळे मेहबुबा जे काही बोलल्या त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मेहबूबा मुफ्ती हा एक राजकीय पक्ष आहे. जो सुरुवातीपासूनचं फुटीरतावाद्यांना पाठिंबा देत आहे, तरीही भाजपने त्यांच्याशी युती करून सत्ता काबीज केली,' अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाने मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचा पक्ष पीडीपीला मजबूत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला पूर्णपणे भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. त्यांच्यासोबत भाजपने सत्तेचा फायदा घेतला आहे. भाजपमुळेचं त्यांना बोलण्याची ताकद मिळाली आहे. (हेही वाचा - 'तुझ्याकडे कोट्यावधी रुपयांची 10 घरे आहेत...'; आमदार निवास्थानावरून मंत्री Jitendra Awhad यांचा Zeeshan Siddique ला टोला)

काश्मीर प्रश्नावर भाजपची मते काहीही असली तरी शिवसेना त्याला नेहमीचं विरोध करेल. मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष भाजपचा खास मित्र राहिला आहे. मुफ्ती हे नेहमीच पाकिस्तान समर्थक राहिले आहेत, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर हा एक वाद आहे. गेल्या 70 वर्षांपासून हा वाद सुरू आहे. पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांशी चर्चा झाल्यावरचं हा वाद सोडवला जाईल, असं मेहबूबा यांनी म्हटलं होतं. या विधानानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने भाजपवर टीका केली जात आहे.