मुंबई (Mumbai) महाराष्ट्रापासून वेगळी करुन केंद्रशासित प्रदेश (nion Territory) करण्यासाठी भाजप छुपा अजेंडा राबवत आहे. त्यासाठी महाराष्ट्रबाहेरुन आलेले काही बिल्डर आणि भाजपचे काही नेते प्रयत्नशिल आहेत. या सर्व उद्योगाचे नेतृत्व किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) यांच्याकडे आहे. ते दिल्लीत जाऊन प्रेजेंटेशन करतात. त्यांचा प्लॅनही रेडी आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मी जबाबदारीने बोलतो आहे. पाठमागील काही वर्षे मी लॉ मेकर राहीलो आहे. शिवसेना नेता राहिलो आहे. त्यामुळे मी हे अत्यंत गंभीरपणे आणि तितक्याच जबाबदारीने सांगतो आहे, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा डाव रचणारे लफंगे हे महाराष्ट्राबाहेरील आहेत. त्यात एक वाराणसीचा लफंगा आहे आणि दुसरा व्यक्ती हा भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठ्या प्रमाणावर निधी पुरवणारा बिल्डर आहे, असेही संजय राऊत यांनी या वेळी म्हटले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी लफंगा म्हणून ते कोणाचा उल्लेख करत आहेत याबाबत माहिती दिली नाही. तसेच, त्या बिल्डरचे नावही सांगितले नाही. प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारले असता 'तुम्हाला इतकी घाई का? हळूहळू सर्व नावे पुढे येतील असे संजय राऊत म्हणाले.' (हेही वाचा, Sanjay Raut: किरीट सोमय्या यांची वकीली करणारे देवेंद्र फडणवीस नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते संजय राऊत)
दरम्यान, किरीट सोमय्या हा चोर आहे. तो दिल्ला जाऊन दोनच कामे करतो. एक खोटी कागदपत्रे दाखवून केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाया कराव्यात यासाठी प्रयत्न करतो आणि दुसरे म्हणजे मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनविण्यासाठी जे काही करता येऊ शकेल ते सर्व करतो. त्यांचा हा डाव कदापीही यशस्वी होणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. किरीट सोमय्या आजवर इतरांना प्रश्न करत होते. आज आम्ही त्यांना प्रश्न करतो आहोत. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेसाठी त्यांनी जमा केलेले पैसे गेले कोठे? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.