Sanjay Raut and Devendra Fadnavis Meeting: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भेट; 2 तास चर्चा, समोर आले 'हे' कारण
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. कोरोना व्हायरस, कंगना वाद, त्यानंतर आता ड्रग प्रकरणात एनसीबीची चाललेली चौकशी. आता यामध्ये एजून एक महत्वाची बातमी आली आहे की. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि शिवसेनेचे नेते, खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांची गुप्त भेट झाली आहे. या बातमीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असा आशयाच्या बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या. आता माहिती मिळत आहे की, ‘सामना’साठीच्या मुलाखतीसाठी ही भेट झाली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव ऊपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

यामध्ये ते म्हणतात. ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने, एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.’

माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाली. या वेळी मुलाखतीबाबत चर्चा झाल्याचे समजत आहे. याआधी शरद पवार यांची सामनासाठी मुलाखत घेतल्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता बिहार निवडणुका झाल्यांनतर त्याला मुहूर्त मिळणार आहे. (हेही वाचा: एकनाथ खडसे पक्ष सोडणार? भाजप राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा डावलल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण)

दरम्यान सध्या संपूर्ण भारताचे लक्ष बिहार निवडणुकांकडे लागले आहे. आज भाजपने नव्या कार्यकारणीची घोषणा केली. या यादीनुसार, महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर. तसेच राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे.