Eknath Khadse: एकनाथ खडसे पक्ष सोडणार? भाजप राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा डावलल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण
Eknath Khadse | (File Photo)

भाजपमध्ये जवळपास 45 वर्षांपेक्षा अधिक काळ सक्रिय असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावलले जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त करून दाखवली आहे. नुकतीच भाजपने आज आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून नाराज नेत्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. मात्र, पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना पक्षाकडून डावलण्यात आले आहे. यामुळे आता एकनाथ खडसे पक्षातून काढता पाय घेणार का? अशा चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

भूखंड घोटाळ्यात मंत्रिपद गेल्यानंतर खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. याबाबत त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही नाकारण्यात आले होते. त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले. खडसे यांना स्वत:ला तिकीट हवे होते. मात्र, पक्षाने ऐकले नाही. परंतु, या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्याने ते आणखीच संतापले होते. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर त्यांना पाठवले जाईल अशी चर्चा होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांना संधी नाकारण्यात आली आहे. हे देखील वाचा- Pankaja Munde And Vinod Tawde: पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती

भाजप कार्यकारिणीची यादी- 

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला आहे. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सुर आळवल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ते अखेर पक्षातून काढता पाय घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.