सांगली (Sangli) येथे भरदिवसा थरारक दरोड्याची (Sangli Robbery) घटना घडली. केवळ एका मैत्रिणीच्या सांगण्यावर वृद्ध महिला डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून तिला जीवे मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी दरोडा घातला. सांगली येथील प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी (Dr. Nalini Nadkarni, Sangli) यांच्यासोबत त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. या दरोडा प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा एका महिलेचाही समावेश असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गुन्हा करण्यासाठी वापरलेले 5 मोबाईल, 4 मोटारसायकली आणि एक कोयता याचाही समावेश आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.
डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरी आरोपींनी सात दिवसांपूर्वी दरोडा टाकला होता. या दरोड्यात आरोपींनी 5 लाख 97 हजारांचे दागिने, 37 हजारांचा मोबाईल, 8 हजार रुपये रोख असा जवळपास 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. दरोड्याची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली. वेगाने तपास केला आणि आरोपींना अटकही केली. (हेही वाचा, Mumbai: चोरीच्या उद्देशाने कॅब ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूहल्ला; 4 जण अटकेत)
सांगली दरोड्यातील आरोपींची नावे
- अमित चंद्रकांत पाचोरे (वय 28)
- सचिन शिवाजी फोंडे (वय 27)
- रोहित देवगोंडा पाटील (वय 23)
- निखिल राजाराम पाटील (वय 31)
- पायल युवराज पाटील (वय 31)
प्राप्त माहितीनुसार, पायल पाचोरे या आरोपीची आणि डॉ. नाडकर्णी यांच्यात ओळख होती. या ओळीखीतून पायल पाचोरे हिने तिच्या मित्रांसोबत कट रचला आणि दरोडा टाकला. आरोपींनी कट केल्या प्रमाणे 5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजणेच्या सुमारास डॉ. नलिनी नाडकर्णी यांच्या घरात प्रवेश केला. नाडकर्णी यांच्या घरात तीन आरोपींनी प्रवेश केला. त्यातील एकाने डॉ. नाडकर्णी यांच्या गळ्याला चाकू लावला. दुसऱ्या दोघांनी घरातील ऐवज लंपास केला. पोलिसांचा ससेमीरा चुकविण्यासाठी आरोपींनी सर्व पुरावे नष्ट केले होते. तरीही पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत गुन्हेगारांना शोधून काढले.