Sangli Road Accident: कार आणि ट्रॅव्हल्समध्ये धडक, एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार, एअर बॅग उघडल्याने एकाचा जीव कसाबसा वाचला
Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भरधाव कार आणि ट्रॅव्हल्स यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सांगली (Sangli Road Accident) जिल्ह्यातील विटा (Vita) शहरानजीक घडली. दोन्ही वाहनांची धडक समोरासमोर झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. भरधाव कार समोरच्या बाजूने ट्रॅव्हल्सला धडकली अशी माहिती आहे. अपघातादरम्यान, कारमधील एअर बॅग वेळीच उघडल्याने एकाच प्राण कसेबसे वाचू शकले असे समजते.

विटा सातारा रोडवर असलेल्या शिवाजीनगर येथे हा अपघात घडला. अपघातातील मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अपघातग्रस्त कुटुंब हे मुळचे गव्हाण येथील असून ते सातारा येथून विट्याच्या दिशेने येत होते. दरम्यान, एक खासगी ट्रॅव्हल्स विट्याहून निघाली होती जी महाबळेश्वर राज्य मार्गावरुन साताऱ्याच्या दिशेने निघाली ही. दरम्यान शिवाजीनगर येथील उतरण उतरत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. (हेही वाचा, Chhattisgarh Accident: भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 10 ठार; छत्तीसगड राज्यातील घटना)

दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या धडकेमध्ये कारचा जागेवरच चक्काचूर झाला. धडक जोरदार असल्याने गाडीतील चौघांचा जागीच मृत्य झाला. अपघातामुळे विटा-सातारा रोडवरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. वेळ सकाळची असल्याने उन्हाच्या आधी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. घटनेची माहिती कळता विटा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करुन नोंद घेतली. नंतर वाहतूक खुली करण्यास प्राधान्य दिले. हळूहळू वाहतूक कोंडी फुटली आणि रस्ताही पुर्ववत झाला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरु आहे.