Sangli: तरुणीवर सातत्याने 2 वर्ष लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक
Rape | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

एका तरुणीवर तब्बल दोन वर्ष लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना सांगली (Sangli) मधून समोर आली आहे. प्रथम बिर्याणीतून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला. इतकंच नाही तर त्याने तरुणीचे अश्लील फोटोज आणि व्हिडिओज देखील शूट केले. त्यानंतर हे व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. अतुल बाजीराव पाटील (42) असं या आरोपीचं नाव असून  या व्यक्तीचे पीडितेच्या घरी नेहमीचे येणे-जाणे होते. तो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील रहिवासी आहे.

आरोपीकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडीलांनी आरोपीला घरी बोलावून जाब विचारला. त्यावर आरोपीने त्यांनाही संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसंच पीडित मुलीचं लग्न होऊ देऊ नका, असंही सांगितलं. अखेर पीडितेने इस्लामपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार, फसवणूक, धमकी आणि ब्लॅकमेल अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. (Thane Gangrape: ठाण्यात 26 वर्षीय मुलीवर 4 जणांकडून सामुहिक बलात्कार; कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल)

दोन वर्षांपूर्वी तरुणी एकटी घरी असताना आरोपी तिच्या घरी आला होता. त्यावेली त्याने तिला गुंगीचं औषध मिसळलेली बिर्याणी खायला दिली. तिची शुद्ध हरपल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. याच आधारे तिला धमकी देत आरोपीने कधी घरी तर कधी विविध लॉजवर नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.