कुत्रा (Dog), शेळी, मेंढी, गाढव, घोडा, म्हैस, रेडा किंवा गाय, बैल अथवा कोंबडा, पोपाट, कबुतर, चिमणी अशा पशु-पक्षांविरधोत कोणी तक्रार देणे आणि पोलिसांनी ती स्वीकारणे. इतकेच नव्हे तर स्वीकारलेल्या तक्रारीवरुन सदर प्राण्या-पक्षावर गुन्हा दाखल करणे म्हणजे काहीसा विचित्र प्रकारच जणू. पण, ऐकावे ते नवलंच! या उक्तीप्रमाणे खरोखरच असे घडले आहे खरे. घटना आहे संगमनेर तालुक्यातील. ज्या घटनेमुळे अवघ्या अहिल्यानगर (जुना अहमदनगर) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. येथे एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चक्क एका रॉटवेलर (Rottweiler Dog) कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर खलनायक कुत्रा आणि कर्तव्यदक्ष पोलीस चर्चेचा विषय ठरले आहेत.
कुत्रा भलताच डँबीस आणि आक्रमक
संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा आहे. लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातामुळे जखमी झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटना अशी की, तक्रारदार महिला ही संगमनेर शहरालगत असलेल्या मळ्यात राहते. याच परिसरात डॉ. पानसरे यांचाही निवास असतो. या डॉक्टर महोदयांनी 'रॉटविलर' प्रजातीचा एक कुत्रा पाळला आहे. कुत्रा भलताच डँबीस आणि आक्रमक आहे. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांवर तो धावून जातो. वेळ प्रसंगी आपल्या जबड्याने तो वाटसरुंना आणि रहिवाशांना चावाही घेतो म्हणे. तो वाहनांच्याही मागे धावतो आणि जोरजोरात भुंकतो. (हेही वाचा, Thane Crime: कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाद, महिलांची भाजीविक्रेत्याच्या घरावर दगडफेक, मारहाण; 10 जणींविरुद्ध गुन्हा दाखल)
खलनायक कुत्रा, कर्तव्यदक्ष पोलीस
सदर तक्रारदार महिला आपल्या दुचाकीवरुन रस्त्याने निघाली असता, कुत्रा त्याच्या सवयीप्रमाणे जोरदार भुंकला. त्याने फाटकाच्या आतूनच महिलेच्या दिशेने धाव घेतली. तो फाटक ओलांडू शकला असता किंवा नाही हा पुढचा मुद्दा. परंतू, कुत्र्याच्या वर्तनामुळे महिला भांबावून गेली. गोंधळलेल्या महिलेचे लक्ष विचलीत झाले आणि तिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकी थेट जाऊन झाडावर आदळली. घटनेमध्ये महिलेला चांगलाच मार बसला आणि दुखापतही झाली. त्यात दुचाकीचेही बरेच नुकसान झाले. या घटनेनंतर महिलेस शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Dog Rape in Ghaziabad: कुत्र्यावर बलात्कार; सासऱ्याच्या कृत्याचा सुनेकडून भांडाफोड, पोलिसांकडून आरोपीला अटक)
पोलिसांनी महिलेवर उपचार सुरु असतानाच रुग्णालयात जाऊन तिचा जबाब घेतला. जबाबामध्ये महिलेने कुत्र्यास जबाबदार धरले असून, चक्क कुत्र्यावरच गुन्हा दाखल केला आहे. डॉ. पानसरे यांचा कुत्रा धावून आल्यानेच आपला अपघात झाल्याचा महिलेचा दावा आहे. अतिशय काल्पनिक वाटावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस आता खलनायक ठरलेल्या कुत्र्यावर काय कारवाई करतात याबाबत उत्सुकता आहे.