मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना (बुधवारी, 6 जानेवारी 2021) औरंगाबाद (Aurangabad) शहराचा उल्लेख संभाजीनगर (Sambhajinagar) असा करण्यात आला. या उल्लेखामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आणि एकच चर्चा सुरु झाली. काही प्रमाणात नाराजीही व्यक्त होऊ लागली. आता या सर्व प्रकारावर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी प्रतिक्रिया दिली. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर हा एक टायपींग एरर (Typing Error, टंकलेखनातील चूक) होती, असे म्हटले. सोबतच पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा मी मंत्री म्हणून आम्ही कोणीच स्वत: ट्विट करत नाही. ट्विटर हॅण्डल करणाऱ्या ज्या व्यक्तीकडून चूक झालीय त्याला समज देण्यात येईल,असेही शेख यांनी म्हटले आहे. अस्लम शेख हे एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलत होते.
औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याची शिवसेनेची मागणी आहे. भाजपचा त्याला पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सावध पवित्र्यात आहे. तर काँग्रसने थेट विरोध दर्शवला आहे. मनसेही संभाजीनगर नामकरण करा अशाच भूमिकेत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय विरुद्ध काँग्रेस एकाकी असे चित्र पाहायला मिळण्याची शक्याता आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Meeting Decision: बांधकाम विकासकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत; पाहा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक निर्णय)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमानोड्डाणमंत्री हरदीप सिंह पूरी यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावे अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्राबाबतचे वृत्त आल्यानंतर काही वेळातच राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सूचट ट्विट केले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय @AmitV_Deshmukh pic.twitter.com/LqkMo2uXgi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 6, 2021
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असेही बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.