Pune: पुणेकरांचा नादच खुळा! लोकांच्या दाढ्या करण्यासाठी एका न्हाव्याने बनवला चक्क 8 तोळ्याचा सोन्याचा वस्तरा
Saloon (Photo Credit: Pixabay)

पुणे तिथे काय उणे, असे म्हटले जाते. पुणेकर (Pune) नेहमीच आपल्या अनोख्या अंदाजातून संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) आकर्षित करत असतात. यातच पुण्यातील एका न्हाव्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहर चर्चेत आले आहे. आळंदी येथील रुबाब सलूनच्या मालकाने लोकांच्या दाढ्या करण्यासाठी चक्क 8 तोळ्याच्या सोन्याचा वस्तरा बनवला आहे. तसेच सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी ग्राहकांना शंभर रुपये मोजावी लागत आहे. दरम्यान, हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातून नागरिकांची गर्दी वाढली आहे.

अविनाश बोरूदिया असे त्या न्हाव्याचे नाव आहे. अविनाश बोरूदिया हे मूळ व्यवसायिक आहेत. त्यांनी युवराज कोळेकर आणि विक्की वाघमारे या दोन तरुणांना सोबत घेऊन रुबाब नावाचे सलूनचे दुकान सुरू केले. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी चक्क चार लाख रुपये खर्च करून 8 तोळ्याचा सोन्याचा वस्तारा बनवला आहे. सोन्याचा वस्तारा बनवण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे? याबाबत अविनाश बोरुदिया विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देत अविनाश बोरुदिया म्हणाले की, "भारतीय संस्कृतीनुसार सोन्याला पवित्र मानले जाते. सोने अरोग्यासाठी चांगले असल्याने प्रत्येकाने सोन्याच्या संपर्कात आले यायला पाहिजे. परंतु, सोने महाग असल्यामुळे दुर्देवाने प्रत्येकाला सोन घालणे शक्य होत नाही. यामुळे सामन्य नागरिकांचेही सोनेरी स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक ग्रहाकाला पाच मिनिटे का होईना सोन्याचा स्पर्श व्हावा, या उद्देशाने सोन्याचा वस्तारा बनविण्यात आला आहे", असे अविनाश बोरूदिया यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- अमरावती मध्ये 21 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लॉकडाऊन तर यवतमाळ मध्ये कडक निर्बंध लागू

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश बोरूदिया यांनी सोन्याचा वास्तरा बनवण्यासाठी सुरुवातीला अनेक सोनारांशी संपर्क केला. हा सोन्याचा वस्तरा बनवून देण्यासाठी कोणताही सराफ तयार झाला नाही .परतुं, त्यांनी हा वस्तारा आपल्या ग्राहकांसाठी राजस्थानच्या कारागिरांकडून बनवून घेतल्याचे सांगितले जात आहे.

याआधीही अडीज वर्षापूर्वी बीडच्या बशीरगंज चौकात असलेले ‘सिजर’ नावाचे हेअर सलूनच्या मालकाने तब्बल अकरा तोळे सोन्याचा वस्तरा बनवून घेतला होता. हा वस्तरा बनवण्यासाठी त्यांना 3 लाख 50 हजार रुपये खर्च आला होता. तर, 70 हजार रुपये मजुरी द्यावी लागली होती.