Anil Deshmukh On Param Bir Singh: न सांगता येण्यासारख्या चुका घडल्यानेच परम बीर सिंह यांच्यावर बदलीची कारवाई- अनिल देशमुख
Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook)

परमबिर सिंह (Param Bir Singh) यांची झालेली बदली ही नेहमीची प्रशासकीय बदली नाही तर ती कारवाई आहे. न सांगता येण्यासरख्या चुका केल्यामुळेच ही कारवाई केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. एका कार्यक्रमादरम्यान आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) पुढे आल्यानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात बोलत होते. आमच्या पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून चुका झाल्या आहेत. त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल. परंतू, सर्वच अधिकारी चुकीचे काम करणारे नसतात. त्यांच्या पाठीहीशी सरकार आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

सरकारला अडचणीत आणणारी माहिती विरोधी पक्षापर्यंत पोहोचतेच कशी? त्यासाठी पोलीस दलातीलच काही अधिकारी कारणीभूत असतात त्यांच्यावर कारवाई करणार का? असे विचारले असता सर्व ठिकाणी गटबाजी असते. प्रसारमाध्यम, राजकीय क्षेत्र असो अथवा पोलीस विभागातही काही प्रमाणात गटबाजी असते. त्यातून अशा चुका होतात. कधी माहिती पूरवली जाते. यासोबतच काही केंद्रीय संस्था असतात त्यांनाही अनेक घटना, घडामोडींची माहिती असते. त्यामुळे विरोधकांपर्यंत अनेकदा माहिती पोहोचू शकते, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, अनेकदा केंद्रीय संस्थांचा वापर हा राजकीय कारणांसाठी होतो. सीबीआयचा वापरही अनेकदा राजकीय हेतूने अनेक प्रकरणांमध्ये करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राने सीबीआयवर बंदी घातली. जर एखाद्या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर त्यासाठी राज्य सरकारची परवानगी सीबीआयला अनिवार्य केली. महाराष्ट्राने घेतलेला निर्णय पाहून देशातील इतर आठ राज्यांनीही असाच निरणय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी या वळी सांगितले. (हेही वाचा, Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांच्याकडून जप्त केलेल्या 'त्या' Mercedes कारसोबत भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटो; काँग्रेसने विचारला सवाल

सचिन वाझे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे होऊ पाहात आहे. या प्रकरणात मलिनी झालेली प्रतिमा सावरण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने पोलीस दलात काहीसे फेरबदल केले. मुख्य म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. इतरही काही पदांवरील चेहरे बदलले. दरम्यान, असे असले तरी हे प्रकरण महाविकासआघाडी सरकारमध्ये बिघाडी करण्यास कारण ठरु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.