राज्यात सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे. याप्रकरणावरुन आज मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर भाजप नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची तसंच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपवण्याची मागणी केली जात असताना भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीनंतर किरीट सोमय्या, आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांच्या प्रतिक्रीया)
नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "सचिन वाझे यांना निलंबित असताना खात्यात घेणे क्राईममध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणे त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली होणे. माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा."
नारायण राणे ट्विट:
माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. (२/२)
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 17, 2021
मुंबई पोलिस आयुक्तांची आज बदली झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. तर इतर भाजप नेत्यांनी ट्विटद्वारे सरकारवर टीकास्त्र डागले. दरम्यान, शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडणं आणि त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू होणं या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांच्यावर अटक आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच मुंबई पोलिस आयुक्तांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या एनआयएच्या तपासाला देखील वेग आला आहे.