डॉलरपुढे रुपया घसरला; महाराष्ट्राला १८ कोटींचा फटका ?
(Photo credits: Devendra Fadnavis,twitter)

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांची होणारी घसरण अद्यापही कायम आहे. या घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसतोय. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या प्रवासासाठी महाराष्ट्र सरकार हेलिकॉप्टर खरेदी करणार होते. मात्र, रुपया घसरल्याने हेलिकॉप्टरच्या किमतीमध्ये वाढ होण्याचा संभव आहे. ही वाढ झाल्यास महाराष्ट्राला तब्बल १८.१६ कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रुपया आणखी घसरणार?

अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ८ मे २०१८ रोजी घेतला होता. हा निर्णय घेतला तेव्हा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य ७२.६९ इतके होते. त्या वेळच्या भावानुसार अमेरिकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल ऑपरेशन या कंपनीकडून हे हेलिकॉप्टर १२७ कोटी ११ लाख रुपयांत खरेदी करण्यात येईल, असे शासन निर्णयात सांगण्यात आले होते. मात्र, सध्याची रुपयाचे मुल्य सतत घसरत आहे. येत्या काळात ही घसरण प्रति डॉलर ८० रुपये इतकी होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदीबाबत नव्याने शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. आता रुपयाच्या घसरणीमुळे हेच हेलिकॉप्टर तब्बल १४५ कोटी २७ लाख रुपयांना खरेदी करावे लागेल. याचाच अर्थ असा की, नव्या दरानुसार हेलिकॉप्टर खरेदी झाल्यास महाराष्ट्राला तब्बल १८.१६ कोटी रुपये जादा मोजावे लागतील असे चित्र आहे.

सरकारकडे एकच विमान

राज्य सरकारच्या सेवेत सध्या एक जेट विमान (स्मॉल एक्झुक्युटीव्ह) आहे. या विमानाची प्रवासी संख्या आठ इतकी आहे. मात्र, या विमानातून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती प्रवास करत असतील तर, हिच प्रवासी संख्या सहा इतकी होते. कारण, अशा व्यक्तिंच्या प्रवासावेळी विमानात असताना एक इंजिनियर आणि एक केबिन क्रू सोबत घेऊन जाणे बंधनकारक असते. दरम्यान, सरकारच्या मालकीचे एक हेलिकॉप्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जात असताना निलंगा येथे अपघातग्रस्त झाले होते. तेव्हापासून ते बंद स्थितीच आहे. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरची खरेदी सरकारसाठी आवश्यक असते.