Tanmay Fadnavis, देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याला 'आरोग्य सेवेतील कर्मचारी' अंतर्गत दिली  कोविडची लस; माहितीच्या अधिकारात समोर आली बाब
Devendra Fadnavis, Tanmay Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुतण्याने काही दिवसांपूर्वी कोविड लस घेण्यावरून सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा रंगली होती. तेव्हाच्या नियमांनुसार 45 वर्षांवरील नागरिकांनाच केवळ लस दिली जात असल्याने फडणवीसांचा पुतण्या तन्मय फडणवीस (Tanamay Fadnavis) अवघ्या विशीतल्या वयात असताना लस कशी घेऊ शकतो? असा सवाल विचारण्यात आला होता. दरम्यान यावर माहितीच्या अधिकारावर समोर आलेल्या गोष्टींनुसार तन्मय फडणवीस याला 'आरोग्य कर्मचारी' या वर्गाखाली लस देण्यात आली आहे. बारामतीच्या माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी विचरलेल्या प्रश्नावर संबंधित विभागाकडून हे उत्तर देण्यात आले आहे.

दरम्यान तन्मय च्या सोशल मीडीया प्रोफाईल वर तो 'अभिनेता' असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता तो आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवून कोरोना प्रतिबंधक लस घेतली का? असा प्रश्नाही अनेकांच्या मनात आला आहे. Tanmay Fadnavis Memes: कोरोना लस घेतल्यावर तन्मय फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल, युजर्सनी मिम्सच्या माध्यमातून उडवली खिल्ली.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांची फेसबूक पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांनी तन्मयच्या लसीकरणावर प्रतिक्रिया देताना 'नियमांना उल्लंघून काही झाले असल्यास ते चूक आहे. तसेच तन्मय माझा लांबचा नातेवाईक असल्याचं' त्यांनी सांगत या विषयावर पडडा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

तन्मय फडणवीस याने पहिला डोस मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात तर दुसरा डोस नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट येथे घेतला होता. 20 एप्रिलला तन्मयचा फोटो व्हायरल झाल्याने ही बाब पुढे आली होती. त्यानंतर याची बरीच चर्चा देखील रंगली. तन्मयने काही तासांतच फोटो डिलीट केला आहे. दरम्यान यानंतर 1 मे 2021 पासून देशात 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे.