गेले कित्येक दिवस तसाच भिजत असलेला ‘राम मंदिर’चा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच संघाने आता देशभरामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर हुंकार रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात नागपूरमधून होणार आहे. राम मंदिर प्रश्नावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना चांगलीच तापलेली असून याबाबत जनआंदोलनाचा इशारा संघाकडून देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी नागपूरमध्ये संघ मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघातर्फे हुंकार रॅलीचे आयोजन केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली हुंकार रॅली संघाच्या भूमीत म्हणजेच नागपूरमध्ये 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
संघपरिवारातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा संघटना एकत्र येत मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. नागपूरनंतर बंगळुरू, नवी दिल्ली याठिकाणीही हुंकार रॅलींचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी हा आमच्या प्राध्यानक्रमाचा मुद्दा नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे केवळ खेदजनक नव्हे तर हिंदूंच्या भावनांचा अपमान करणारे आहे. न्यायालयाने आपल्या प्राधान्यक्रमाचा विचारा करावा, अन्यथा गरज पडल्यास राम मंदिरासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभे करावे लागेल’, असा स्पष्ट इशारा केंद्रीय कार्यकारिणीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला होता. त्यामुसार आता शिवसेनेनंतर संघाकडूनही आंदोलन सुरु झाले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं होतं. त्यासाठी भागवतांनी बाप्पाचा विधिवत अभिषेकही घातला होता.
साध्वी ऋतंभरा आणि अन्य मंडळी 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हुंकार रॅलीतील प्रमुख वक्ते असतील. नागपूरप्रमाणेच दिल्ली व बेंगळुरूतही हुंकार रॅलीचे आयोजन केले जाईल आणि शेवटची हुंकार रॅली अयोध्येत होईल. अशी माहिती देण्यात आली आहे.