RSS शिवसेनेच्या संपर्कात पण आता खूपच उशीर झाला, शरद पवार सोबत असल्याने चिंता नाही: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपल्यासोबत संपर्क करत असल्याचा दावा केला आहे. तसेच, आता फारच उशीर झाला आहे. आता आपल्यासोबत शरद पवार असल्याने कोणतीही काळजी नसल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरएसएसने (RSS) उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि भाजप यांचे मिळून सरकार सत्तेत आले तर आपल्याला आनंद होईल असे म्हटले होते. मात्र, ठाकरे यांनी मात्र संघाची मध्यस्थी फारशी मनावर घेतली नाही.

प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, उद्धव ठाकरे हे आपल्या आमदारांसोबत हॉटेल ललित येथे चर्चा करत होते. तेव्हा त्यांनी आरएसएसकडून आपणास संपर्क केला जात असल्याचा दावा केला. तसेच, पुन्हा एकदा शिवसेना-भाजप यांचे सरकार राज्यात सत्तेवर आणूया असेही सांगितले. मात्र, आता फारच उशीर झाला असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

दरम्यान, आमदारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस पक्षही आपल्या सोबत आहे. त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करु शकते. तितके संख्याबळही आपल्याकडे आहे. (हेही वाचा,शरद पवार, अजित पवार यांची वेगवेगळी भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतदार जनता कोणासोबत? )

ट्विट

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तिन्ही पक्षांची एक नवी आघाडी महाराष्ट्रात उदयास येत आहे. ही आघाडी सत्तास्थापन्येच्या जवळ पोहचली असताना अजित पवार यांनी आश्चर्यकारकरित्या बंड केले आणि ते भाजपसोबत गेले. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.