महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे संभाजी छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभेवर जाण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत तर दुसरीकडे शिवसेना (ShivSena) या सहाव्या जागेसाठी ठाम आहे. त्यामुळे आता संभाजीराजेंना राज्यसभेत जायचं झाल्यास त्यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारून जावं असा पर्याय देण्यात आला आहे. आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी संजय राऊत, विनायक राऊत सह काही शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये या विषयावरही चर्चा झाली असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेची ऑफर आता संभाजीराजे छत्रपती स्वीकारणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. आज 'वर्षा'वर बैठकीनंतर मीडीयाशी बोलताना संजय राऊत यांनी यावेळेस शिवसेना आपले खासदार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे ते सहाव्या जागेवर ठाम आहेत. संभाजीराजे यांच्यासोबत शिवसेनेचे खास संबंध आहेत. त्यांचे काही विचार आहेत. पण त्यांनी सेनेची उमेदवारी घेऊन जावं असे म्हटलं आहे. दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील तो घेऊन पुढे जाऊ पण यामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
मागील वेळेस संभाजीराजे भाजपा पुरस्कृत राष्ट्रपती शिफारसीने राज्यसभेवर गेले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केले होते. पण आता शिवसेनेने सहावी जागा लढण्याचं ठरवल्याने उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. हे देखील नक्की वाचा: संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून 'स्वराज्य' संघटनेची स्थापना; राज्यसभा अपक्ष लढविण्याचीही घोषणा.
संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेचे पहिले उमेदवार आहेत. 26 मे दिवशी ते अर्ज भरणार आहेत. पण दुसरा उमेदवार कोण असेल यची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. चंद्रकांत कहिरे, उर्मिला मातोंडकर यांची नावं चर्चेमध्ये आहेत. पण अद्याप कुणाचं नाव जाहीर झालेलं नाही.