आरपीआय (ए) (Deepak Nikalje President of RPI-A) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गँगस्टर छोटा राजन (Chhota Rajan) याचा भाऊ दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांची फेरनिवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची एक परिषद मुंबईतील चेंबुर येथे बुधवारी (18 जानेवारी) रात्री पार पडली. या बैठकीत बहुमताने घेण्यात आलेल्या निर्मयात दीपक निकाळजे यांच्या नावावर आरपीआय (ए)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहे. त्या केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपपल्या परिने बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे छोटेमठे पक्षही कामाला लागले आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या परिषदेसाठी देशभरातील सुमारे 30 राज्यांतून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते मुंबईत आले होते. हे सर्व नेते चेंबुर येथे पार पडलेल्या परिषदेत सहभागी झाल्याचे आरपीआय (ए) द्वारे सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशभरातील आंबेडकरी अनुयायांनी आणि त्यांच्या विचारांच्या सर्वच नेत्यांनी आरपीआय (ए) च्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करावे, असे अवाहन अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर दीपक निकाळजे यांनी केले. (हेही वाचा, Chhota Rajan Birthday Poster: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीचे सामने, पोस्टरही झळकले; मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल)
आगामी काळात आरपीआय (ए) अधिक सक्षमपणे काम करणार आहे. त्यासाठी यापुढे होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्येही आरपीआय (ए) आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. त्या दृष्टीने पक्षाने पक्ष कामाला लागला असून, कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, असे अवाहन दीपक निकाळजे यांनी केले. पक्षाची स्थापना 1990 मध्ये झाली. पण, पक्ष स्थापन होऊन आज तीस वर्षे उलटून गेली तरीही पक्षाला म्हणावे तसे यश आले नाही. पक्षाला यश न येण्याची कारणे आपण शोधली आहेत. त्यामुळे पक्षवाढीसाठी यापुढे जोमाने प्रयत्न केले जातील. कोणी आघाडीचे निमंत्रण दिले तर पक्षहित पाहूनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे दीपक निकाळजे यांनी सांगितले.