BJP,CPI | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अमेरिकेशी अणून करार असो की, एफडीआय गुंतवणूक. जेएनयू प्रकरण असो की वर्गसंघर्ष असो एकमेकांसमोर नेहमीच कट्टर विरोधक म्हणून उभे ठाकणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि भाजप (BJP) यांच्या युती होईल असे स्वप्नातही कोणी पाहिले नसेल. पण, असे घडल्याची चर्चा आहे. परस्पर संमतीतून अलिखीत किंवा मूक संमतीतून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी पंचायत समिती (Wani Panchayat Samiti) सभापती, उपसभापती निवडणुकीत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समजते. आश्चर्यकारक ठरलेल्या या सांकेतीक युतीत भाजपचे संजय पिंपळशेंडे सभापती तर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रज्योती शेंडे यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याचे समजते आहे.

प्राप्त माहितीनुसार, एकूण 8 इतकी सदस्यसंख्या असलेल्या वणी पंचायत समिती पक्षीय बलाबल पाहता भाजप 4, शिवसेना 3 आणि कम्युनिस्ट पक्ष 1 असे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असणारे एक मत भाजपला कमी पडत होते. त्यातूनच ही युती झाल्याचे पुढे येत आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून या युतीला अधिकृत पुष्टी मिळू शकली नाही. तसेच, अशा प्रकारची युती करण्याचा पक्षाचा कोणताही अधिकृत निर्णय झाला नाही. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी लोकशाही मार्गाने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मतदारांना (8 सदस्य) मतदानाचे अवाहन केले. यातून भाजपचा सभापती तर, उपसभापती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झाला आहे. मात्र, यात दोन्ही पक्षांनी युती केल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा, महाविकाआघाडीचा 'ख्वाडा' सोडवताना देवेंद्र फडणवीस घरच्या मैदानावर चितपट; नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पराभूत)

दरम्यान, भाजप आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात अधिकृत युती झाली नसली किंवा तसा दोन्ही पक्षांचा विचारही नसला तरीसुद्धा सभापती, उपसभापती निवडणूकीत घडलले एकूण राजकारण पाहता वेगळी चर्चा सुरु झाली आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजय पिंपळशेंडे यांनी शिवसेनेच्या तुकाराम खाडे यांचा पराभव केला. तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत चंद्रज्योती शेंडे यांनी शिवसेनेच्या वर्षाताई पोतराजे यांचा पराभव केला. संजय पिंपळशेंडे आणि चंद्रज्योती शेंडे यांना प्रत्येकी 5 मते मिळाली. तर, विरोधात असलेल्या तुकाराम खाडे आणि वर्षाताई पोतराजे यांना प्रत्येकी 3 मते मिळाली.