Pune | Photo Credits: Twitter/ANI

मुंबई प्रमाणेच पुणे शहरातील कोरोनाचा वाढता विळखा आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे काढणारा आहे. दरम्यान पुण्यात आता रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनानंतर प्रशासनानेदेखील त्यांची दखल घेत येत्या 4-5 दिवसांमध्ये रेमेडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होऊन परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली आहे.

ANI च्या ट्वीटनुसार, अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहिती देताना 'पुण्यात अंदाजे 45 हजार इंजेक्शनची गरज नोंदवण्यात आली आहे. मागील 3-4 दिवसांमध्ये 6 हजार इंजेक्शन मिळाली आहेत त्यानंतर 3 हजार इंजेक्शन आली आणि काल (14 एप्रिल) 1200 इंजेक्शन आली आहे'. असे सांगितले. 'या लसींचे वितरण सारखेच केले जात आहे पण आता साठा संपला आहे. आमच्याकडून इंजेक्शन तयार करणार्‍या कंपन्यांशी देखील चर्चा सुरू आहे आणि आम्हांला विश्वास आहे की येत्या 4-5 दिवसांत परिस्थिती सुधारेल.' अशी आशा व्यक्त केली आहे. पुणे: रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा केमिस्टच्या बाहेर घेराव.

दरम्यान पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय सिंह देशामुख यांनी पुण्यातील परिस्थितीवर बोलताना,'आम्ही फ्लाईंग स्क्वॉड्स बनवली आहेत. त्यांच्याद्वारा विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. बेकायदेशीर गोष्टींवर अंकुश ठेवला जात आहे. सोबतच कोविड प्रोटोकॉलनुसार, रेमडेसीवरची खरंच गरज असलेल्यांनाच ती उपलब्ध करून देण्याकडे आमचा प्रयत्न आहे.'

ANI वृत्तसंस्थेसोबत बोलताना एका महिलेने सांगितलेल्या अनुभवानुसार, तिचे वडील मागील 6 दिवसांपासून हॉस्पिटल मध्ये आहेत. त्यांच्यावर अजूनही पूर्ण उपचार सुरू झालेले नाहीत. सध्या ते आयसीयू मध्ये आहेत. त्यांना रेमडीसीवीरची गरज आहे पण शहरात ते कुठेच मिळत नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत.

पुण्यामध्ये 31 मेपर्यंत रेमडेसीवीर मिळवण्यासाठी 020-26123371 किंवा टोल फ्री नंबर 1077वर संपर्क करण्याचे आवाहान करण्यात आले आहे. हा मदत कक्ष सध्या 31 मे पर्यंत कार्यान्वित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.