राज्यात यंदा गेल्या 10 वर्षातील 219.49 लाख क्विंटल विक्रमी कापूस खरेदी; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
State Cooperation Minister Balasaheb Patil (PC -Facebook)

महाराष्ट्रात यंदा पणन विभागाने गेल्या 10 वर्षातील 219.49 लाख क्विंटल विक्रमी कापूस खरेदी केली आहे. यासंदर्भात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co Operation Minister Balasaheb Patil) यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की, राज्यात हंगाम 2019-20 मध्ये 44.30 लाख हेक्टर कापसाची लागवड झाली आहे.

यावर्षी पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत आणि राज्या अंतर्गत कापसाचे दर हे कमी होत गेले. शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येवू नये, याकरीता राज्यात कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यांत आली असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 257 जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाख 66 हजार 368 वर पोहोचली)

दरम्यान, राज्यामध्ये 40 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. सातत्याने कापसाचे पडणारे दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि कापूस खरेदीला विलंब होऊ नये, यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे अधिकचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, असंही बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. (हेही वाचा - COVID19 Cases In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढली; दिवसभरात 1 हजार 90 नव्या रुग्णांची नोंद, 52 जणांचा मृत्यू)

कापूस पणन महासंघाद्वारे परिस्थितीनुसार, 127 कापूस खरेदी केंद्र कोरोना पूर्वी सुरू करण्यात आली होती. कापूस पणन महासंघाकडील पुरेसा सेवक वर्ग उपलब्ध नसल्याने अधिकचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती पाहून शासनाने कृषी विभागातील कृषी पदवीधर सेवकांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. कापूस पणन महासंघाद्वारे 2019-20 मध्ये एकूण 3. 33 लाख शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात यावर्षी पहिल्यादाचं जून व जुलै महिन्यामध्ये कापसाची खरेदी करण्यात येत असल्याचंदेखील पाटील यांनी स्पष्ट केलं.