उत्तर प्रदेशमध्ये हापूर (Hapur) येथे नगर कोतवालीच्या समोरील वेलनेस हॉस्पिटलच्या (Wellness Hospital) डॉक्टरांचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटात कापूस आणि पट्टी सोडल्याचा आरोप केला जात आहे. डॉक्टरांच्या या कृत्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेले तेव्हा महिलेच्या पोटात ड्रेसिंग (बँडेज) असल्याचे समोर आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला, त्यानंतर डॉक्टर रुग्णालयातून पळून गेले.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करत, संबंधित रुग्णालयाबाहेर बराच वेळ निदर्शने केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून कुटुंबीयांना शांत केले.
अहवालानुसार, रेल्वे रोड येथील निराधार सेवा समितीचे सदस्य टिंकू यांनी सांगितले की, त्यांची पत्नी पूनमची प्रकृती 20 दिवसांपूर्वी बिघडली होती. तपासणी केली असता, तिच्यावर अपेंडिक्स शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टिंकूने 15 दिवसांपूर्वी पत्नीला शहर पोलीस ठाण्यासमोरील वेलनेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी 13 दिवसांपूर्वी तिच्यावर ऑपरेशन करून 6 दिवसांनी तिला रुग्णालयातून घरी पाठवले. यानंतर पूनमच्या पोटातील टाक्यांमधून पू बाहेर येऊ लागल्याचे दिसून आले. टिंकूने याबाबत डॉक्टरांना माहिती दिलीवर ते पूनमला रोज बँडेजसाठी हॉस्पिटलमध्ये बोलवू लागले.
बुधवारी पूनमची प्रकृती बिघडल्याने टिंकूने तिला दुसऱ्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यावेळी ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी महिलेच्या पोटात कापूस आणि पट्टी सोडली होती, त्यामुळे संसर्ग पसरल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी कसेतरी टाके काढून तिच्या पोटातील पट्टी आणि कापूस बाहेर काढला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि इतर लोकांनी वेलनेस हॉस्पिटलसमोर गोंधळ घातला.
शहर कोतवालीचे प्रभारी निरीक्षक रघुराज सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर अहवाल नोंदवून पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसून दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.