Narayan Rane Arrest Case: नारायण राणे यांच्या अटके नंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

'केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाराष्ट्र सरकारद्वारे करण्यात आलेली अटक ही घटनात्मक मुल्यांचे हनन करणारी आहे. अशा प्रकारे केलेल्या कोणत्याही कारवाईला आम्ही घाबरणार नाही. भाजपला मिळणाऱ्या जनआशिर्वाद यात्रेमुळे हे लोक चिंतेत आहेत. आम्ही आमची लढाई लोकशाही पद्धतीने लढत राहू, कायम ठेवत राहू', अशी भूमिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनीही राणे यांना झालेल्या अटकेवरुन (Narayan Rane Arrest Case) पक्षाची भूमिका मांडली आहे. 'केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरुर काही चुकीची वक्तव्ये केली असतील. परंतू, त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारकडून केलेली कारवाई ही घटनेची पायमल्ली करणारी आहे', असे संबित पात्रा यांनी म्हटले.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आह की, 'केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र! (हेही वाचा, Narayan Rane Arrested: मोदी मंत्रिमंडळातील मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक)

जेपी नड्डा ट्विट

देवेंद्र फडणवीस ट्विट

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे यांच्यावर संगमेश्वरमध्ये जी कारवाई करत आहात. या कारवाईच्या मागे असलेल्यांनी लक्षात ठेवावे की ही मुघलशाही किंवा तालिबानी राजवट नाही. महाराष्ट्राचा तालिबान करू नका.

प्रविण दरेकर ट्विट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ट्विट रिट्वीट करत भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या सोबत आहे. पुढेही राहील असे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालात धाव घेतली. परंतू, मुंबई उच्च न्यायालयानेही राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूण ला रवाना झाले होते. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार, असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस नारायण राणे यांना घेऊन महाडला रावाना झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.