(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलीस ( Mumbai Police) आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांची बदनामी करणे अनेकांना भोवण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस बदनामी प्रकरणी (Mumbai Police Defamation Case) पोलिसांनी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल केले आहेत. इतरही अनेकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अनेकांनी ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) वापरत मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांची प्रतीमा मलिन होईल असा मजकूर, सामग्री हेतुपुरस्पर प्रसिद्ध केली. याची नोंद घेत पोलिसांनी आता तपास मोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणात दाखल झालेले दोन गुन्हे हा त्याचाच भाग असल्याची माहिती मुंबई पोलीस सायबर सेल उपायुक्त रश्मी करंदीकर (Rashmi Karandikar) यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील विविध अकाउंट्सवर मुंबई पोलिसांची बदनामी, प्रतिमा मलिन करणारा मजकूर, सामग्री आढळली. यात लिखित पोस्ट, प्रतिमा, मॉर्फ फोटो, व्हिडिओ क्लिप्स, व्हिडिओ अशा विविध सामग्रीचा समावेश आहे.काही ठिकाणी तर अश्लाघ्य भाषा वपरत मुंबई पोलीस दलास बदनाम करण्याचा आणि कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुतांश सोशल मीडिया अकाऊंट्स ही बनावट आहेत. अशाच दोन बनावट अकाऊंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस सायबर सेल उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे. (हेही वाचा, सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणा आडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्‍यांनी माफी मागावी: महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी)

मुंबई पोलीस सायबर सेलने नुकताच एक अहवाल दिला आहे. प्रसारमाध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार सुशांत सिंह राजपूत मृत्य प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80 हजार पेक अकाऊंट्स नव्याने उघडण्यात आली. या सर्व अकाऊंट्सवरुन मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आला. मुंबई पोलीस या सर्व अकाऊंट्सचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे ही सर्व अकाऊंट्स साधारण 14 जून किंवा त्यानंतर उघडण्यात आल्याचेही हा अहवाल नमूद करतो. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा CBI चा तपास कुठपर्यंत आला हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत- गृहमंत्री अनिल देशमुख)

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली नसून ती आत्महत्याच असल्याचा अहवाल एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला दिला. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाल्याचा आरोप करणारे लोक तोंडघशी पडले आहेत. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली असून, 'या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांचे खच्चीकरण करण्यासाठी जाणवपूर्वक मुंबई पोलीस दलाची बदनामी करण्यात आली. परंतू, एम्सच्या अहवालाचे आम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारम आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. उशिर झाला तरी सत्य बाहेर येतेच,' असेही परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.