शिवसेनेचं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचं स्वपन साकार झाल्यानंतर काल (25 ऑक्टोबर) पहिलाच दसरा मेळावा पार पडला. यावेळेस आता वर्षभर सरकार चालवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील काल थोडा वेळ मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजुला ठेवत त्यांच्या विरोधकांवर चौफेर टीका केली. त्यांच्या भाषणाची सुरूवातच नारायण राणे आणि कुटुंबीय यांच्यावर बरसत झाली. 'बेडका'ची उपमा देत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांच्या नावाला धक्का देण्यासाठी वारंवार केलेल्या बेछुट आरोपांचं खंडन त्यांनी यावेळी केले. यानंतर निलेश राणेंनी ट्वीटरवरून पुन्हा वाद छेडला आहे. आज नारायण राणे दुपारी 4 च्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते उद्धव ठाकरेंना पुन्हा समोरून प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
भाजपाचे खासदार नारायण राणे यांचा खरपूस आणि ठाकरे शैलीत समाचार घेत त्यांची तुलना बेडकाशी केली. एका बेडकीने वाघ पाहिला पण बेडूक वाघ कसा होईल? असा टोला देखील हाणला. यानंतर खवळलेल्या राणे कुटुंबाने देखील ट्वीटर वरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.
नारायण राणे आणि शिवसेना हा फार जुना वाद आहे. नारायण राणे हे माजी शिवसैनिक आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री देखील झाले होते. मात्र पक्ष विरोधी कारवायांमुळे त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी झाली आणि तेव्हापासून राणे विरूद्ध शिवसेना अशा अनेक शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. मागील काही दिवसांत त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरूनही आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप लावले होते.