राज्यसभा निवडणूक 2022 (Rajya Sabha Election 2022) महाराष्ट्रातून बिनविरोध व्हावी यासाठी मविआ (Rajya Sabha Election 2022: Under the leadership of Chhagan Bhujbal MVA) आग्रही आहे. भाजप (BJP) सुद्धा परंपरा पाळण्यासाठी इच्छुक आहे. याबाबत महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यात पडद्यामागे जोरदार खलबतं सुरु आहेत. यासाठी मविआतील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. शिष्टमंडळात छगन भुजबळ यांच्यासोबत काँग्रेसचे सुनील केदार आणि शिवसेनेचे अनिल देसाई होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
मविआ शिष्टमंडळाेन बैठकीतील चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला. या वेळी छगन भुजबळ म्हणाले दोन्ही बाजूंनी चर्चा छान झाली. आम्ही (मविआ) त्यांना (भाजप) सांगितले राज्यसभेचा उमेदवार मागे घ्या तुम्हाला विधानपरिषदेला एक जागा वाढवून देतो. संसदेत भाजप संख्याबळाच्या दृष्टीने अधिक आहे. विरोधकांचा आवाजच कमी आहे. त्यामुळे एखादा सदस्य वाढविण्याची आम्हाला संधी मिळत असेल तर ती भाजपने विरोधकांना द्यावी. राज्यसभा बिनविरोध करण्याचा करण्याचा 20 वर्षांची परंपरा आपण पालन करुया. यावर त्यांनी (भाजप) मविआला प्रस्ताव दिला की, राज्यसभेवर आमचा तिसरा उमेदवार जाऊ द्या. आम्ही आपल्याला विधानपरिषदेत एक जागा वाढवून देतो. यावर आम्ही पुन्हा एकदा बैठक करणार आहोत. चर्चेसाठी आम्ही वेळ घेतला आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. (हेही वाचा, RS Elections 2022: शिवसेनेच्या संजय राऊत, संजय पवार यांच्याकडून विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित)
मविआची पत्रकार परिषद संपताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी भाजप राज्यसभेची सहावी जागा लढवेन असे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले आम्ही (भाजप) राष्ट्रीय पक्ष आहोत. आमच्या काही परंपरा, संकेत आणि मुद्दे आहेत. त्यामुळे राज्यसभा आमच्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे पक्षाचा एबी फॉर्म जोडलेल्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेणे शक्यच नाही. त्यामुळे महाविकासआघाडीला आम्ही प्रस्ताव दिला आहे. त्यांनी राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा भाजप त्यांना विधानपरिषदेसाठी मदत करेन. हा प्रस्ताव मान्य नाही झाल्यास निवडणूक अटळ आहे, असे स्पष्ट शब्दात चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपत आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते की घोडेबाजार होतो हे पाहावे लागणार आहे.